पुणे : नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जाहीर झाला आहे.
दिल्लीतील राजेंद्र भवन येथे १२ डिसेंबर २०१७रोजी होणार्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार आणि दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या वेळी बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. गंगवाल करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळीविरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक काम केले आहे. त्यांच्या या वैद्यकीय आणि अहिंसा सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.